कल्याण पूर्वेतील कुख्यात 12 गुंडाच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई
कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांची माहिती
गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ याची मोठी कारवाई
कल्याण-कल्याण डोंबिवलीत काही दिवसापासून गुंडांनी उन्माद केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. काही गुन्हेगारांविरोधात एमपीडीए कारवाई नंतर आत्ता मोका अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीत चोरी, घरफोडी, लोकांना मारहाण, रात्रीत दंगल करणे, गाडय़ांची तोडफोड करणे आदी प्रकारचे गुन्ह्यात वाढ झाली आहे. विशेष करुन कल्याण पूर्व भागात काही दिवसापासून स्थानिक गावगुंंडांनी एक प्रकारची दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यावर तलवारी घेऊन फिरणे, लोखंडी सळई, दांडके घेऊन फिरणे, बर्थ डे पार्टी दरम्यान फायरिंग करणो हे प्रकार घडले होते. या पाश्र्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यानी या गुन्हेगाराना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील, डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे यांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सूचना केली होती. 14 एप्रिल रोजी दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा घडला होता. यात 12 आरोपी होते. या सर्व आरोपींच्या विरोधात 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. या सर्वाच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.