इम्तियाज खान
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा राहुल नगर येथील म्हात्रे कुटुंबीयांकडून श्री लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना व मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी असे 3 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात कलशारोहण, पूजापाठ, होम हवन, भजन कीर्तन, रथ शोभायात्रा, सत्यनारायणाची महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. अखिल भारतीय आखाडा परिषद कुंभमेळ्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते श्री लक्ष्मी नारायण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या श्रीस्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीश्री १००८ महंत गणेशानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते कालशारोहण करण्यात आले तर भागवतभूषण वाचस्पती ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजींनी सलग तीन दिवस आपल्या प्रवचन व प्रबोधनाने भक्तांचे मार्गदर्शन केले. चिंचपाडा गावाचे रहिवासी काशिनाथ बाळाराम म्हात्रे आणि त्यांचे बंधू एकनाथ बाळाराम म्हात्रे यांनी हे मंदिर बांधले आहे. याबाबत माहिती देताना एकनाथ म्हात्रे म्हणाले की, त्यांचे वडील बाळाराम तुकाराम म्हात्रे यांची या संकुलात मंदिर बांधण्याची दीर्घकाळची इच्छा होती. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशिनाथ आणि एकनाथ म्हात्रे यांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना केली. आज शुक्रवारी संत-महंतांच्या उपस्थितीत भजन कीर्तन व पूजापाठ यासह सर्व धार्मिक विधीने श्री लक्ष्मी नारायण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली. ३ दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सवामुळे राहुल नगर चिंचपाडा येथील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. आज शुक्रवारी पूजापाठानंतर राहुल नगर व चिंचपाडा येथील शेकडो भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.