इम्तियाज खान
कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील नमकबंदर परिसरातील ड्रेनेज लाईन तुंबल्या असून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. नागरीकांना नाक मूठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी् अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस एय्याज मौलवी यांनी केला आहे.
कल्याण गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम करीत असताना ड्रेनेज लाईन तोडण्यात आलेल्या होत्या. या लाईन तोडल्यानंतर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. ड्रेनेज लाईन नादुरुस्त असल्याने दर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्याचबरोबर या भागातील पाण्याच्या पाईप लाईन या ड्रेनेज लाईनजवळून असल्याने घाण पाणी नागरीकांच्या घरात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरीकांना उलटय़ा जुलाबाचा त्रस होत असल्याच्या मुद्याकडे मौलवी यांनी लक्ष वेधले आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन ही समस्या सोडविण्याची मागणी मौलवी यांनी केली आहे.