नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 7 एप्रिल : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधातील कारवाईवरुन न्यायालयाने राज्य सरकारचे ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने या प्रकरणात राजद्रोह कसा होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी वरच्या कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकीकडे राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा असं मत व्यक्त केलं होतं, असं असतांना याच सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजद्रोहाच्या गुन्ह्यासंदर्भात वरच्या कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हनुमान चालीसा देवासमोर, मंदिरासमोर म्हटली पाहिजे. मात्र मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्यामागचा नेमका अर्थ काय? यावरूनच यामागचे राजकारण सिद्ध होतं. न्यायालयाचा आम्ही आदर करतो. मात्र त्यावरील राजद्रोहाचा गुन्हा बाबत वरच्या कोर्टात जाणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. एकंदरीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारच सरसावले असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.