डोंबिवलीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हाॅटेल जवळ, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार शिवसैनिकाचे नाव आहे. ते शिंदे समर्थक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. डोंबिवलीच्या मानपाडा रोडला असलेल्या शिवसेना मध्यवर्ती शहर कार्यालयाचे ते आस्थापना प्रमुख आहेत. तर हितेश साधुराम पंजाबी (४७), पूजा हितेश पंजाबी (४५, रा. शिवलिला सोसायटी, लासी हाॅलसमोर, हेमराज डेअरी जवळ, उल्हासनगर-१) अशी आरोपी जोडप्याची नावे आहेत. २०१९ ते मे २०२३ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी उल्हासनगर मधील हितेश आणि त्यांची पत्नी पूजा पंजाबी यांनी शिवसैनिक प्रकाश माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रकाश माने यांना आम्ही जिन्स कारखान्यामध्ये काही पैसे गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हालाही आकर्षक परतावा मिळेल. या दाम्पत्याच्या गुंतवणूक योजना आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रकाश यांनी या योजनेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला.
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक ३५ दिवसांनी ५० हजार रुपये असा पंजाबी दाम्पत्याचा गुंतवणूक आराखडा होता. माने यांनी या योजनेत रोख स्वरुपात एकूण २२ लाख रुपये गुंतविले. गुंतवणुकीनंतर माने यांना दर महिन्याला ठराविक परतावा मिळणे अपेक्षित होते. पंजाबी दाम्पत्याने वेळोवेळी खोटी कारणे देऊन आकर्षक व्याज देण्यास माने यांना टाळाटाळ सुरू केली. मागील तीन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आकर्षक व्याज मिळत नसल्याने शिवसैनिक माने यांनी मुद्दल रक्कम परत करण्यासाठी पंजाबी दाम्पत्याकडे तगादा लावला. ती रक्कम परत करण्यास दाम्पत्य टाळाटाळ करू लागले. व्याजा बरोबर मूळ रक्कम परत मिळत नसल्याने हितेश आणि पूजा पंजाबी दाम्पत्य आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटल्यानंतर प्रकाश माने यांनी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक केशव हासगुळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.