एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 27 गावांमध्ये पाणी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे याच 27 गावांत असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील रिजन्सी अनंतम् मधील रहिवाशांनी रविवारी तेथील बिल्डरच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर आंदोलन आणखी चिघळणार असल्याचे आंदोलनाला बसलेल्या रहिवाशांनी सांगितले.
रिजेन्सी अनंतम् मधील मागील आठ-दहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. बिल्डर आणि प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे आवश्यक तितका पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे रविवारी सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या ऑफीसमध्ये मोर्चा नेला. या रहिवाशांनी पाण्यासाठी टाहो फोडत बिल्डरला धारेवर धरले. रहिवाशांची बिल्डरने भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रहिवाशांनी आंदोलन तूर्त स्थगित केले. मात्र अशी परिस्थिती यापुढे निर्माण झाल्यास त्यानंतर होणाऱ्या परिणामांना बिल्डरसह सरकारी प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा या रहिवाशांनी दिला