भाजप माजी नगरसेविकेने घेतली आयुक्तांची भेट
डोंबिवली-शहराच्या पश्चिम भागातील विष्णूनगर पोस्ट ऑफिसची धोकादायक इमारत पाडण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.
माजी नगरसेविका धात्रक यांनी आयुक्त दांगडे यांची काल महापालिका मुख्यालयात भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक निवेदन दिले. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक हे देखील उपस्थित होते. विष्णूनगर पोस्टऑफिसची इमारत धोकादायक झाली आहे. ही इमारत स्टेशन परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी आहे. गेल्या सात वर्षापासून ती धोकादायक झाली आहे. या इमारतीसमोर भाजी विक्रेते बसतात. ही इमारत पडल्यास मोठी जिवित हानी होऊ शकते. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर स्टेशन परिसरात फेरीवाले बसतात. १५० मीटरच्या अंतरात फेरीवाले बसले नाही पाहिजे. मात्र फेरीवाले बसल्याने त्याठिकाणी वाहतूकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या कारवाई पथकात पुरेसे मनुष्यबळ नाही. कारवाई करण्याची मागणी धात्रक यांनी यापूर्वीच केली होती. या मागणीला आठ दिवस उलटून गेले तरी महापालिकेने या बाबत ठोस कारवाई केलेली नाही. ही मागणी विचारात घेऊन आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करुन नागरीकांना दिलासा द्यावा असे धात्रक यांनी आयुक्तांना सांगितले.