भाजप नेत्यांना पिडीत महिलेचा सवाल
पोलिस ठाण्यासमोर पिडीत महिलेचे उपोषण सुरु
नंदू जोशी आमदारांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे संपूर्ण पक्ष त्यांच्यापाठीशी उभा आहे. मी पण भाजप कार्यकर्ती आहे. पक्ष मला न्याय का देत नाही. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही असा संतप्त सवाल नंदू जोशी प्रकरणातील पिडीत महिलेने उपस्थित केला आहे. ही महिला गेल्या तीन दिवसापासून मानपाडा पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसली आहे.
भाजपचे डोंबिवलीतील पदाधिकारी नंदू जोशी यांनी पिडीत महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिस ठाण्यात जाेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचे तीव्र पडसाद शहरासह भाजप शिवसेनेच्या राजकारणात उमटले आहे. भाजपने जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या प्रकरणात शिवसेनेचा पाठिंबा भाजपला मिळाला नाही. पोलिस अधिकारी शेखर बागडे यांना शिवसेना पाठिशी घालत असून जोशी सारख्या जुन्या कार्यकर्त्याचे मनाेबल खच्चीकरण करुन त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होत आहे असा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे भाजपच्या बैठकीत शिवसेनेला कल्याण लोकसभेत सहाकार्य न करण्याचा ठराव मंजूर केला. या प्रकरणावरुन राजकारण अधिक तापले आहे. बागडे यांच्या बदलीवरुन शिवसेना भाजप आमने सामने आले. खासदार शिंदे यांनी राजीनामा देण्याचे विधान केले. बागडे यांची बदली होत नसल्याने बागडे यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोप करीत त्यांची ईडीकडून चाैकशी करण्याची मागणी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपने केली आहे. मात्र पिडीत महिला ही सुद्धा भाजपची जुनी कार्यकर्ती आहे. मात्र तिच्या पाठीशी भाजप उभी राहिलेली नाही. त्यामुळे महिलेने न्यायाासाठी पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरु केले असून बागडे यांची बदली करण्यात येऊ नये. त्यांनी दाखल केलेला गुन्हा योग्य असून त्यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर नंदू जोशी यांना अटक करण्यात यावी या प्रकरणी पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे न्यायासाठी पिडीत महिलेने दाद मागितली आहे. तिचे उपोषण सुरु असून उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.