कल्याणमध्ये मंदिरासमोर आणि शिवसेना शाखेला लागून असलेल्या दोन फूल विक्रेत्यांच्या दुकानाची शेड महापालिकेने काढली आहे. फूटपाथवर अतिक्रमण केल्याच्या ठपका ठेवत महापालिकेने ही कारवाई केली आहे. हॉटेल्स, मोठी शोरुम, शाळा, दुकाने समोर फूटपाथवर अतिक्रमण सोडून फक्त शाखेच्या बाजूला असलेल्या फूल विक्रेत्यांच्या शेडवरच कारवाई का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी उपस्थित केला आहे. मंदिरासमोर अनेक वर्षापासून सुरु असलेल्या या दुकानावरील कारवाईमळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शितला देवीचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच शिवसेनेची मध्यवर्ती शहर शाखा आहे. शाखेला लागून आणि मंदिरासमोर असलेल्या दोन फूल विक्रेत्यांची दुकाने आहे. ही दुकाने मंदिराचे पूजारी यांची आहे. गेल्या अनेक वर्फापासून ही दुकाने चालवली जात आहेत. केडीएमची अधिकारी संदीप म्हात्रे यांच्या पथकाने या दोन फूल विक्रेत्यांच्या दुकानावर कारवाई केली. दुकानाची अतिक्रमित शेड काढली. म्हात्रे यांचे म्हणणे आहे की, त्यांना एक लिखित तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीनुसार फूटपाथवरील अतिक्रमीत शेड हटविण्यात आली आहे. या दुकानाच्या बाजूला दोन माेठी शोरुम आहेत. या शोरुम मालकाने फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. त्यावर महापालिकेकडून कारवाई का केली जात नाही अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे त्याविषयी काही एक उत्तर नव्हते. या बाबत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी संताप व्यक्त करीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १९९२ साली रस्ता रुंदीकरण झाले. तेव्हा मंदीराला शिवसेनेच्या शाखेची जागा देण्यात आली. याठिकाणी मंदिराचे पुजारीच फूल विक्रीचा व्यवसाय करतात. महापालिकेने त्यांच्या विरोधात आज कारवाई केली. मात्र शहरात मोठी हॉटेल्स, शोरुम, शाळा यांनी देखील महापालिकेचे रस्त्यावरील फूटपाथ अतिक्रमीत केले आहे. त्यांच्या विरोधात महापालिका का कारवाई करीत नाही असा सवाल बासरे यांनी उपस्थित केला आहे.