कल्याणमधील नागरीक शिवप्रकाश सिंह यांचा आरोप
kalyan
डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट गव्हर्नर पद्धतीचा अवंलब करीत आहे. स्मार्ट सिटी नगरीत स्मार्ट पर्याय वापरण्यास नागरीक उत्सूक आहेत. मात्र केडीएमसीने एका नागरीकाला मालमत्ता कराचा बिलाचा भरणा करण्यासाठी आ’नलाईन पर्याय उपलब्ध करुन दिला नाही. हा अनुभव ज्या नागरीकाला आला त्या नागरीकाचे नाव शिवप्रकाश सिंह असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया करण्याचे सांगितले असताना महापालिकेत डिजिटल आ’नलाईन रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जात नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
सिंह हे कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीत राहतात. त्यांचा रामबागेतील झिरो लेनमध्ये एक दुकानाचा गाळा आहे. त्यांना दुकानाच्या मालमत्ता कराचे बिल महापालिकेकडून आकारण्यात आले आहे. ६ हजार ४३४ रुपये मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी सिंह हे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात आले. त्यांनी आ’नलाईन रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यांना आ’नलाईनचा पर्याय उपलब्ध करुन दिला गेला नाही. अखेरीस त्यांनी या प्रकरणी अधिकारी वर्गाकडे दाद मागितली. अधिकारी वर्गाकडे जाऊनही त्यांची समस्या सुटली नाही. सिंह यांनी एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली. त्यानंतर त्यांनी मालमत्ता कराचा रोख भरणा केला. महापालिका स्मार्ट सिटीच्या बाता करते. मात्र आ’नलाईन रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन न देता रांगेत उभे राहण्यास भाग पाडते. तर अशा स्मार्ट सिटीचा काय उपयोग असा संतप्त सवाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.
केडीएमसी प्रशासनाची प्रतिक्रिया
दरम्यान यासंदर्भात उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले की, आशा प्रकारची कोणतीही तक्रार आम्हाला प्राप्त झालेले नाही. आमच्याकडे आ’नलाईनचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.