- डोंबिवली येथील मानपाडा पोलिसांची कारवाई
डोंबिवली -रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या दोन जणांना मानपाडा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान यापैकी एका आरोपीने पालघर आणि ठाणे जिल्ह्यात एकूण २९ गुन्हे केल्याची नोंद असून कल्याण परिक्षेत्रात केलेले एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. या दुकलीकडून एकूण १५ लाख ७५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
मूळचा राजस्थान येथील रहिवासी असणारे आणि सध्या भिवंडी स्थित रमेश पालीवाल (34) आणि महेश जठ ( 35 ) या दोघांनी मिळून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा धंदा सुरू केला होता. यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील महिलांमध्ये घबराटीचे वातावरण होते. सदर गुन्हे उघडकीस आणणे व आरोपींना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कल्याण के डीसीपी सचिन गुंजल यांचा मार्गदर्शनाखाली विविध पोलिस पथके स्थापन करण्यात आली. मानपाडा पोलीस ठाण्याकडून तयार करण्यात आलेल्या पथकाने मानपाडा रामनगर, विष्णूनगर , टिळक नगर, खडकपाडा , कोळशेवाडी, महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटना , त्यांच्या वेळा, आरोपीच्या येण्याजाण्याच्या वेळा यांचा अभ्यास करून सीसीटीव्ही द्वारे आरोपीचे शेवटचे लोकेशन यांची पाहणी केली. त्याद्वारे कल्याण-डोंबिवली परिसरात येणारे-जाणारे मार्गावर पाऊल ठेवून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न चालू केले. यावेळी त्यांचा संशय बळवल्याने त्यांनी महेश आणि रमेश या दुकलीना ताब्यात घेतल्यानंतर जवळपास नऊ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी एकूण १५ लाख २५ हजार रुपयांचे ३०५ ग्रॅम वजनाचे सोने त्यांच्याकडून जप्त केले. त्याचबरोबर एक दुचाकी वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूण १५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी विष्णुनगर पोलिस ठाणे हद्दीतील एकूण पाच, मानपाडा, टिळक नगर, खडकपाडा, कोळसेवाडी हद्दीतील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस सहाय्यक आयुक्त दत्तात्रय कराळे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हे गुन्हे उघडकीस आणले आहेत.