कोळेगाव नाका ते मानपाडा रस्त्याचे काम सुरू
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन

Uncategorized

कल्याण- कल्याण ग्रामीणमधील कोळेगाव ते घेसर या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पूर्ण करण्यात आले आहे असून या भागातील वाहतुक सुरळीत झाली आहे. याच रस्त्याचा पुढचा भाग म्हणून आता कोळेगाव नाका ते मानपाडा मुख्य रस्त्यापर्यंतचा भागाचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह स्ते करण्यात आले.
डोंबिवली शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी महत्त्वाचे असलेल्या कोळेगाव घेसर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले. या कामामुळे या मार्गवरील प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र या रस्त्याचे काम कोळेगाव ते मानपाडाच्या कल्याण-शीळ या मुख्य रस्त्यावरपर्यंत करण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्याकडे केली होती. या मागणीला मंजुरी देते एमएमआरडीएने २ कोटी १७ लाखांची निविदा प्रक्रिया राबवली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. आता लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. हा रस्ता पूर्णपणे कॉक्रीटीकरण झाल्यास काटई जंक्शनला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कल्याण – शीळ रस्त्यावरून तळोजा येथे जाण्याकरिता पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने कल्याण – शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. नागरिकांचा प्रवास सुखकर आणि गतिमान होणार आहे. या याप्रसंगी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *