डोंबिवली-एका सराईत चोरटय़ाला अटक करुन मानपाडा पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या पाच बाईक आणि पाच रिक्षा हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून मानपाडा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचा एकच धडाका लावला आहे.
कल्याण डोंबिवलीत एकीकडे सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वात कारवाई सुरु आहे. अनेक सराईत गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली . तर काहींच्या विरोधात मोका लावण्यात आला. शहरात कायदा सुव्यवस्था दृष्टीने पोलिसांच्या या कारवाईचा सर्वत्र कौतूक होत असतना कल्याण डोंबिवली पोलिसांकडून चोरीस गेलेल्या वस्तूंचा शोध मोहिम सुरु आहे. या पाश्र्वभूमीवर डोंबिवली मानपाडा पोलिसांनी एका सराईत चोरटय़ाला डोंबिवली पूर्व भागातील कांचन गावातून अटक केली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या सूचनेनंतर पोलिस अधिकारी अनिल भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आकाश ढोने हा सराईत चोरटा आहे. त्याच्याकडून पाच बाईक आणि पाच रिक्षा हस्तगत करण्यात आलेल्या आहे. पुढील तपास सुरु आहे.