हल्लेखोर तरुणाला दिव्यातून अट
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील गर्दीतून वाट काढत रामनगर भागातील रिक्षा स्टँडवर पायी चाललेल्या एका महिलेचा धक्का दोन तरुणांना लागला. महिलेने आपणास मुद्दाम धक्का मारला म्हणून एका तरुणाने महिलेला जाब विचारुन रस्त्यावरच बेदम मारहाण सुरू केली. हातामधील लोखंडी कड्याने मारहाण झाल्याने महिलेच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. रविवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात हा प्रकार घडला.
वृद्ध महिलेने या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला नाव, पत्ता शोधून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सोहम संतोष सावंत (२१, रा. जय भोले सोसायटी, दातिवली गाव, दिवा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, अंजली फोजा देवडिगा (६४, प्रभा सोसायटी, तुकारामनगर , डोंबिवली) या रविवारी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात भाजीपाला खरेदीसाठी आल्या होत्या. बाजारपेठेत खरेदी झाल्यानंतर त्या रामनगर मधील तुकारामनगर रिक्षा वाहनतळाकडे पायी चालल्या होत्या. रविवार सुट्टीचा दिवस खरेदीसाठी गर्दी असल्याने पायी चालताना तक्रारदार अंजली यांचा धक्का बाजुने चाललेल्या दोन तरुणांना लागला. अंजली यांनी याबद्दल चूक मान्य केली. तरीही आपणास मुद्दाम धक्का मारला म्हणून आरोपी संतोष सावंत याने अंजली यांना भररस्त्यात बेदम मारहाण सुरू केली. इतर नागरिकांनी संतोषला रोखण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता. स्वताच्या हातामधील कड्याने तो महिलेला मारहाण करत होता. या मारहाणीचे व्रण आणि त्याच्या जखमा अंजली यांना झाल्या आहेत. अंजली यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️