अंमली पदार्थ सेवन का करता म्हणून जाब विचारल्याने गर्दुल्ल्यांची रहिवाशाला मारहाण
डोंबिवली :
पहाटेच्या वेळेत घरा बाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता. आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का, असे प्रश्न डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील एका रहिवाशाने घराबाहेर बुधवारी पहाटे तीन वाजता बसलेल्या गर्दुल्ल्यांना केले. या विचारण्याचा राग आल्याने चार जणांच्या टोळक्याने रहिवाशाला, त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आपल्या पतीला मारहाण होते म्हणून पत्नी बाहेर येऊन मध्ये पडली तर तिलाही गर्दुल्ल्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे.
प्रीतम म्हात्रे, प्रवीण भोईर, सोनु भोईर, करण वाल्मिकी (सर्व रा. मोठागाव, डोंबिवली पश्चिम) अशी हल्लेखोर गर्दुल्ल्यांची नावे आहेत. मोठागाव रेतीबंदर येथे राहणारे तानाजी काळू काटे (४२, रा. मोठागाव) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात तरुणांच्या विरुध्द तानाजी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mतानाजी काटे हे बुधवारी पहाटे उठले होते. त्यांना घराबाहेर बोलण्याचा आवाज येत होता. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर त्यांना मोठागाव मधील काही गर्दुल्ले अंमली पदार्थांचे सेवन करत आहे असे दिसले. आपल्या घराबाहेर बसून उमदे तरुण कुटुंबीयांना अंधारात ठेऊन अंमली पदार्थ सेवन करत असल्याने त्याचा राग तानाजी यांना आला. त्यांनी या गर्दुल्ल्यांना ही काय अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का ? असे रागाच्या भरात बोलले. त्याचा राग आरोपी तरुणांना आला. गर्दुल्ल्यांनी मिळून लाकडी दांडक्यांनी तानाजी काटे यांना बेदम मारहाण सुरू केली. तानाजी यांनी बचावासाठी ओरडा सुरू करताच पत्नी पौर्णिमा घराबाहेर आली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून ती मधे पडली. तर गर्दुल्ल्यांनी तिलाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे.
या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिले अधिक तपास करत आहेत.
मागील काही वर्षापासून डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर खाडी किनारी रात्रीच्या वेळेत अंमली पदार्थ सेवन करणारे अनेक गर्दुल्ले गटाने बसलेले असतात. खाडी किनारी भागात खारफुटीची झुडपे असल्याने गस्तीवरील पोलीस खाडी किनारी आले की हे गर्दुल्ले लपून बसतात, किंवा पळ काढतात, असे स्थानिकांनी सांगितले.