पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसर
आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयम
नागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट
डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीकांची चांगली गैरसोय झाली आहे.
डोंबिवलीच्या नांदिवली येथील सर्वोदय पार्क परिसरात पावसाचे पाणी साचून नागरीकांना या समस्येचा सामना करावा लागतो. या प्रश्नावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठविला आहे. तसेच सत्ताधा:यांना टिकेचे लक्ष केले आहे. कालच आमदार पाटील यांनी या भागाची पाहणी अधिकारी वर्गासोबत केली. अधिकारी वर्गाला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर टिकेचे लक्ष केले होते. आज पुन्हा सायंकाळी पाऊस पडला पुन्हा नांदिवली सूर्योदय पार्क परिसरात पाणी साचून हा परिसर जलमय झाला. नागरीकांना पुन्हा जलमय परिस्थितीचा सामना करावा लागला. या साचलेल्या पाण्यातूनच नागरीकांना वाट काढावी लागली. आमदारांनी केलेली पाहणी ताजी असताना त्यातून अधिकारी वर्गाने काही एक बोध न घेतल्यानेच आज पुन्हा त्याठिकाणी परिसर जलमय झाला.
एकीकडे नांदिवली परिसरात ही परिस्थिती असताना दुसरीकडे कल्याण मुरबाड हा नगरकडे जाणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. म्हारळ पाडा ते कांबा, वरप दरम्यानचा रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरही आज पावसाचे पाणी साचून रस्ता जलमय झाला होता. या जलमय रस्त्यातून वाट काढताना नागरीकांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली.