कल्याण- पश्चिम येथील रेतीबंदर परिसरातील दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल दरम्यान कल्याण पूर्व विभागाला पाणीपुरवठा करणारी ११०० मी मी व्यासाची व नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी १४०० मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी वापरात आहे. वरील परिसरातून जात असलेल्या मुख्य जलवाहिनी वरील अनधिकृत नळजोडण्यांचा शोध घेऊन त्या खंडित करण्याची मोहीम महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेसानुसार आज करण्यात आली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, उपअभियंता, त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी जेसीबी, वेल्डिंग मशीन व प्लंबिंग साहित्याच्या तसेच बाजारपेठ पोलिस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुर्गाडी किल्ल्यासमोरील ११०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी वरील दीड इंचाचे १२ नळ कनेक्शन आज खंडित केले. त्याच प्रमाणे चिराग हॉटेलच्या मागील परिसरातील ११०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी वरील दीड इंचाचे ४ नळ कनेक्शन व १ इंचाचे २ नळ कनेक्शन आज खंडित करण्यात आले तसेच दारुफला मस्जिद पुढे ११०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी वरील १ इंचाचे ३ नळ कनेक्शन्स खंडित करण्यात आले त्याचप्रमाणे सर्वोदय सृष्टी इमारतीमागे दीड इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनी वरील ३ नळ कनेक्शन असे एकूण २४ अनधिकृत नळ कनेक्शन आजच्या कारवाईत खंडित करण्यात आले.