फटाके फोडण्यावरुन कल्याण पूर्वेत जोरदार राडा
२० ते २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नागरीकांकडून जल्लोष साजरा केला गेला. मात्र कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात फटाके फोडण्याच्या वादातून वाद झाल्याने गालबूाेट लागले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कल्याण डोंबिवलीत अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नागरीक आपल्या परीने जल्लोष साजरा करीत होते. ठिकठिकाणी आतषबाजी केली जात होती. कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लाबल रुग्णलयासमोर काही तरुण फटाके फोडत असताना वाद झाला. दोन गट आमने सामने आले. या गटामध्ये वाद सुरु असताना मध्यस्थी करण्यासाठी तिसरा गटही आला. या तिन्ही गटात नंतर जोरदार राडा सुरु झाला. जवळपास अर्धा पाऊण तास हा राडा सुरुच होता. या राड्या दरम्यान काही तरुण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसानी तीनही गटांच्या विरोधात भादवी ३२४,३२६ आणि रायटिंगची कलमे लावली आहेत. पोलिसानी २० ते २५ जणांना आरोपी केले आहे. पुढील तपास सुरु आहे. कल्याण पूर्वेत राड्याची ही पहिलीच घटना नाही. काही ना काही निमित्ताने याठिकाणी वाद आणि राडे होतच राहतात. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई केली पाहिजे. या तरुणांना समुपदेशानाची ही गरज आहे.