कल्याण:संत सेवालाल महाराजांची 284 व्या जयंतीनिमित्त संत सेवालाल युवा सेनेच्या वतीने कल्याण मध्ये जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर येथील देशमुख होम्स कॉम्प्लेक्स येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथावर संत सेवालाल महाराजांचे चित्र लावण्यात आले होते. बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून शोभा यात्रेत सहभागी झाल्या. तर तरुण-तरुणी डीजेच्या गाण्यांवर नाचताना दिसत होते. या मिरवणुकीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात परिसराचा दौरा केला. शोभायात्रेनंतर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाच्या तरुण पिढीच्या वतीने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे संत सेवालाल युवा सेनेच्या सदस्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वीपर्यंत संत सेवालाल महाराज यांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरी होत नव्हती. मात्र आता काळ बदलत आहे, युवा पिढीमध्ये समाजाबद्दल जागरूकता व्हावी आणि संपूर्ण समाज एकत्र यावा या उद्देशाने संत सेवालाल युवा सेनेतर्फे शोभा यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात आयोजकांनी बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा संदेश दिला. जयंती उत्सवाचे आयोजन संत सेवालाल युवासेना अध्यक्ष दिपू चव्हाण, उपाध्यक्ष धैनू राठोड, सुरज राठोड, रमेश चव्हाण, अंबु चव्हाण, दामू राठोड, प्रकाश पवार, शिवा राठोड, नंदू पवार आदींनी केले होते. कल्याण डोंबिवलीतील बंजारा समाजाच्या शेकडो लोकांनी शोभायात्रेचा आनंद लुटला.