विनयभंगाच्या मानसिक धक्क्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
कल्याण जवळील कुंभारपाडा गावातील एका तरुणीचा जवळच्या नातेवाईकाच्या मुलाने विनयभंग केला. हा प्रकार सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या २१ वर्षाच्या तरुणीने राहत्या घरात रविवारी थायमाईट हे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीवर कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरुणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश रामचंद्र कुंभार असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, माजर्ली गावातील एक ५० वर्षाची महिला आपल्या दोन मुलींसह राहते. तिचे पती काही वर्षापूर्वी मरण पावले आहेत. ही महिला मोलमजुरी करुन आपला घरगाडा चालविते. दिवाळी सणाच्या काळात पणत्यांना मागणी असते. या महिलेने मातीच्या पणत्या तयार केल्या होत्या. या पणत्या विक्रीसाठी ती शेजारच्या आपटी गावात गेली होती. घऱी या महिलेची २१ वर्षाची मुलगी एकटीच होती. शेजारी काकांचा मुलगा लोकेश कुंभार आणि तरुणी गप्पा मारत बसले होते. तरुणीने आता दुपारची वेळ झाली आहे. तू घरी जा. मी थोडा वेळ घरात आराम करते असे सांगितले.
घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत लोकेश पुन्हा तरुणीच्या घरी आला. तरुणी ज्या खोलीत आराम करत होती. त्या खोलीत जाऊन त्याने तरुणी बरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तात्काळ त्याला दूर लोटले. घाबरुन जाऊन तरुणी शेजारी असलेल्या काका दत्तात्रय कुंभार यांच्या घरी गेली. त्यानंतर लोकेश तरुणीच्या घरीच होता.
संध्याकाळी आई घरी आल्यावर तरुणीने आपल्या आईला घडला प्रकार सांगितला. मुलगी आणि आई दोघेही दत्तात्रय कुंभार यांच्या घरी जाऊन तुमचा मुलगा लोकेशने मुलीचा विनयभंग केला असल्याचे सांगितले. लोकशेच्या आई वडिलांनी मुलगा असे काही करणार नाही असे सांगून तरुणी, तिच्या आईला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोघीही घरी परतल्या. आईने आपल्या मुलींना हा प्रकार सांगितला.
रविवारी सकाळी तरुणीची आई, तिची दुसरी मुलगी घरात काम करत असताना त्यांना आपली मोठी मुलगी अजून का उठत नाही म्हणून ती तिच्या खोली गेली. तेव्हा तिला मुलीच्या तोंडाला उग्र विषारी वास येत असल्याचे दिसले. तिने मुलीला काय झाले विचारले. तिने आपण थायमाईट विषारी द्रव्य प्यायले असल्याचे सांगितले. आईने तात्काळ गावातील एका खासगी वाहनाने मुलीला टिटवाळ्यातील महागणपती रुग्णालयात नेले. तेथून तिला कल्याण मधील श्वास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.