अग्निशमन विभाग हा नेहमीच नागरिकांच्या जीवित रक्षणाचे, पूरपरिस्थितीत, आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना वाचवण्याचे अत्यंत जोखमीचे काम करीत असतो, अशा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी येथील अग्निशमन मुख्यालयाला कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली मधील नारायणा ई- टेक्नो स्कूलमधील सुमारे 282 विद्यार्थी यांनी त्यांच्या 20 शिक्षकांसमवेत भेट दिली आणि जिज्ञासेपोटी तेथील कार्यप्रणालीची माहिती जाणून घेतली.
आग प्रतिबंधक नियंत्रणाबाबत प्राथमिक स्तरावर कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, जर आग लागली तर आगीवर नियंत्रण आणणेकामी कोणती प्रक्रिया करावी, याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व सब ऑफिसर भाऊसाहेब पगार यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह सादरीकरणही करुन दाखवण्यात आले तसेच सदर शाळेतील शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत अग्निशामक आणि आणीबाणी विभागामार्फत समाधानकारक मार्गदर्शन करण्यात आले.
अग्निशमन यंत्रणेबाबत चांगल्याप्रकारे दिलेल्या आणि सविस्तरपणे समजून सांगितलेल्या माहितीबाबत तसेच प्रात्यक्षिक सादरीकरणाबाबत सदर शाळेने “अग्निशमन व आणीबाणी सेवा” विभागाचे आभार व्यक्त केले.