डोंबिवली- डोंबिवलीत पांढर्या घुबडाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
एमआयडीसी निवासी भागामध्ये एम्स हॉस्पिटल जवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरू असोसिएशन तर्फे दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार रोजी सकाळी संधी पूजा चालू असताना तेथील मंडपातील आवारात बांबूवर साक्षात एका दुर्मिळ पांढर्या करड्या रंगाचे घुबड अवतरले. ते घुबड बराच वेळ त्या ठिकाणी थांबून दुर्गा देवी अणि तेथे चाललेली पूजा यांचे निरीक्षण करीत होते. सदर पूजेला आलेल्या भक्तांनी हे शुभसंकेत मानले असून साक्षात देवीने घुबडाच्या रुपात येवून भक्तांना दर्शन दिले असे त्यांचे म्हणणे होते. पांढरे घुबड हे लक्ष्मीदेवीचे वाहन म्हणुन मानले जाते. सदर प्रकाराने भक्तांमध्ये उत्साह संचारला असून देवीमातेचे रूप पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशी त्यांची भावना निर्माण झाली आहे. यावर्षी प्रथमच एमआयडीसी मध्ये बंगाली कल्पतरू असोसिएशनने दुर्गापूजेचे आयोजन केले होते. आज विजयादशमी या शुभदिवशी सायंकाळी या दुर्गादेवीचे विसर्जन होणार आहे अशी माहिती जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी दिली आहे.